भारत-पाक सीमेवरील निर्माण झालेल्या तणावाबाबत भारत युद्धखोर भाषा करीत असून, पाकिस्तान संयमी वागत असल्याच्या उलटय़ा बोंबा करणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार मात्र थोडय़ाच काळात नरमल्या. भारतीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्यासोबत ताबारेषेजवळ झालेला प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
सीमेपलीकडून राजकीय नेते आणि लष्करी अधिकारी यांच्या विधानांना प्रसिद्ध करून प्रश्न आणखी तापवत ठेवण्याऐवजी  शस्त्रसंधीचा आदर करत उभय देशांनी ताबा रेषेवरील प्रश्नावर चर्चा करायला हवी. उभय राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्रालय पातळीवर  ही चर्चा होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून नमूद केले. सध्या विविध विधानांद्वारे वाढत चाललेला तणाव हा निष्फळ असल्याचे त्या म्हणाल्या.
अश्रफ यांच्या अटकेवरून घमासान
पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्या भ्रष्टाचाराबाबत सबळ पुरावे नसल्याचे स्पष्टीकरण भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख फसीह बोखारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिले. मात्र बोखारी यांच्या स्पष्टीकरणाने सर्वोच्च न्यायालयाचे समाधान झाले नाही त्यामुळे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय व भ्रष्टाचार विरोधी पथकामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
कराचीत आमदाराची हत्या
‘मुत्तहिदा कौमी मूव्हमेण्ट’चे (एमक्यूएम) आमदार मंझर इमाम आणि त्यांच्या तीन अंगरक्षकांची चार अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी कराचीतील ओरंगी परिसरात गोळ्या घालून हत्या केली. इमाम यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तेथून त्वरित पसार झाले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने अद्याप स्वीकारलेली नाही. कराचीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रक्तरंजित चकमकी झडल्या आहेत.