२६/११ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झाकीऊर रेहमान लख्वी याला पाकिस्तान सरकारने शुक्रवारी तीन महिन्यांसाठी ताब्यात घेतले. लख्वी याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे शुक्रवारी सकाळी त्याला रावळपिंडीतील कारागृहातून बाहेर काढण्यात आले. मात्र, बाहेर आल्यावर सरकारने लगेचच त्याला ताब्यात घेतले. सरकारी पक्षाचे प्रमुख वकील चौधरी अजहर यांनी याबाबत माहिती दिली.
‘मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर’ या पाकिस्तानातील कायद्याप्रमाणे लख्वीला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. लख्वी कारागृहातच राहणार असल्याचे पाकिस्तान सरकारने भारताला सांगितले असल्याचेही चौधरी अजहर म्हणाले. लख्वीला जामीन मंजूर झाल्याचा भारताने तीव्र निषेध केला होता. लोकसभेमध्ये शुक्रवारी याविरोधात ठराव मांडण्यात आला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला. सर्वपक्षीय सदस्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दहशवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी लख्वीला जामीन मंजूर केला. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट आखणे आणि हल्ला घडवून आणण्यात साह्य़ करणे, असे आरोप लख्वी याच्यावर ठेवण्यात आले आहेत. हल्ल्यातील सात आरोपींपैकी लख्वी हा एक आरोपी आहे.
मंगळवारी पेशावर येथील लष्करी शाळेतील नृशंस हत्याकांडाच्या निषेधार्थ बुधवारी देशातील सर्व न्यायालयांमधील वकिलांनी उत्स्फूर्त बंद पाळला असताना लख्वी आणि इतर सहा आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दहशतवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी त्याचा अर्ज मंजूर केला होता.