पाकिस्तान चीनकडून ५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मोजून आठ पाणबुडय़ा खरेदी करण्याच्या बेतात आहे. चीन करीत असलेला हा आजवरचा सगळ्यात मोठा शस्त्रविक्रीचा सौदा असण्याची शक्यता असून, पाकिस्तानशी आपले संरक्षणविषयक संबंध आंतरराष्ट्रीय करारांनुसारच असल्याचे सांगून चीनने या सौद्याचे समर्थन केले आहे.
चीनकडून ८ पाणबुडय़ा विकत घेण्यास राष्ट्रीय सुरक्षा समितीने तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव रिअर अ‍ॅडमिरल मुख्तार खान यांनी नॅशनल असेंब्लीच्या संरक्षणविषयक स्थायी समितीला मंगळवारी सांगितले.
गेल्या महिन्यात पाकिस्तानचे नौदल प्रमुख मोहम्मद झकाउल्ला हे चीनच्या दौऱ्यावर गेले असता या व्यवहाराला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचे वृत्त आहे. झकाउल्ला यांनी २६ मार्चला चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे उपाध्यक्ष फैन चँगलाँग यांची भेट घेतली होती.
चीनचा ‘कायम मित्र’ मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानला या प्रकल्पाचा खर्च भरून काढण्यासाठी चीन दीर्घ मुदतीचे कर्जही देण्याची शक्यता आहे.