आंतरराष्ट्रीय जलसीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत किमान ३८ भारतीय मच्छीमारांना पाकिस्तानी किनारपट्टी संरक्षण अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. बुधवारी संध्याकाळी पाकिस्तान मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सी या संरक्षण संस्थेने मच्छीमारांना अटक करून त्यांच्या सात बोटीही जप्त केल्या. कराची बंदरानजीक नेमक्या सीमा स्पष्ट नसताना ही अटक करण्यात आल्याचे दिसत आहे. अटक केल्यानंतर या मच्छीमारांना पाकिस्तानी पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले. पाकिस्तानमध्ये सागरी मार्गानी अवैधपणे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या मच्छीमारांवर ठेवण्यात आला आहे. अरबी समुद्रातील सागरी सीमा नेमकेपणाने स्पष्ट नसल्यामुळे पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांकडून वारंवार मच्छीमारांना अटक केली जाते. अशा मच्छीमारांना अनेक महिने तुरुंगात खितपत पडावे लागते आणि दोन्ही देशांच्या नेत्यांच्या महत्त्वाच्या भेटींचे औचित्य साधत त्यांना मुक्त केले जाते.