उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांना समन्स बजावले. बासीत यांना उरी हल्ल्यातील काही पुरावेदेखील देण्यात आले असून या पुराव्यांमधून दहशतवादी हे पाकिस्तानमधूनच आल्याचे स्पष्ट होते. या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचा मार्ग दाखवणा-या दोघा जणांची नावही पाकिस्तानला देण्यात आली आहेत.
भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी अब्दुल बासीत यांना मंगळवारी समन्स बजावले. यात जयशंकर यांनी उरी हल्ल्यातील पुरावे सादर केले. दहशतवाद्यांना मार्ग दाखवणा-या दोन तरुणांची नाव पाकिस्तानला देण्यात आली. फैझल हुसैन (२०) आणि यासीन खुर्शीद (१९) अशी या दोघांची नाव आहेत. हे दोघेही पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादचे रहिवासी आहेत. मोहम्मद काबीर आवान आणि बशरत हे या दोघांचे हस्तक होते अशी माहितीही पाकला देण्यात आली आहे. तसेच उरीत हल्ला करणा-या एका दहशतावाद्याची ओळख पटली असून हाफीज अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तोदेखील पाकव्याप्त काश्मीर निवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही सर्व माहिती बासीत यांना देण्यात आली आहे. उरीतील हल्ल्यावरुन भारतातील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असतो हे स्पष्ट होते आणि भारत याचा विरोध करतो असे जयशंकर यांनी बासीत यांना सुनावले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी ही माहिती दिली आहे.
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २२ सप्टेंबररोजी जयशंकर यांनी बासीत यांना समन्स बजावत दहशतवाद्यांकडे आढळलेल्या जीपीएस प्रणाली, कपडे, शस्त्रास्त्र यांची माहिती दिली होती. गरज पडल्यास भारत दहशतवाद्यांच्या हाताचे ठसे आणि डीएनएचे नमुनेही पाकिस्तानला देऊ असेही जयशंकर यांनी म्हटले होते.
दरम्यान, एकीकडे भारताने बासीत यांना पुरावे दिले असले तरी दुसरीकडे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी उरी हल्ला हा भारतानेच घडवलेला हल्ला आहे असे कांगावा केला. पाकिस्तानचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही असेही त्यांनी म्हटले आहे. भारत काश्मीर प्रश्नावर गंभीर नाही हे जगाला माहित आहे. पाकिस्तानविरोधात भारताला जगभरातून कुठूनही पाठिंबा मिळू शकला नाही असा दावाही आसिफ यांनी केला आहे.