भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा पाकिस्तानकडून फेटाळण्यात आला आहे. भारताने कोणताही सर्जिकल स्ट्राईक केला नसून केवळ नियंत्रण रेषेपल्याड गोळीबार केल्याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) संपर्क कार्यालयाने म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय लष्कराने केलेल्या धडक कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधील पाच दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. काल रात्री १२.३० ते ४.३० च्या दरम्यान नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या हद्दीत ५०० मीटर ते २ किलोमीटरपर्यंत आतमध्ये शिरत भारतीय सैन्याने ही कारवाई केली. यासाठी भारतीय सैन्य हेलिकॉप्टरद्वारे पाकिस्तानी हद्दीत उतरविण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली. दरम्यान, या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून प्रतिहल्ला करण्याची शक्यता लक्षात घेता राजस्थान आणि गुजरातमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १९ जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली. याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रातील सकारात्मक कल मागे टाकत मुंबई शेअर बाजाराच निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ५०० पेक्षा जास्त अंशांनी कोसळला.