यंदाच्या वर्षांत आर्थिक वाढीचे लक्ष्य गाठण्यात पाकिस्तानला अपयश आले असून ५.५ टक्के लक्ष्य असताना केवळ ४.७ टक्के दरावर समाधान मानावे लागले आहे. पाकिस्तानला आर्थिक आघाडीवर अपयश येण्याचे कारण शेतीवरचे जास्त अवलंबित्व व त्या क्षेत्रातील खराब कामगिरी हे आहे. राष्ट्रीय लेखा समितीची बैठक नुकतीच झाली त्यात चार प्रांतांचे प्रतिनिधी उपस्थित होते व त्यात काही तांत्रिक तज्ज्ञांचाही समावेश होता. औद्योगिक क्षेत्रात मात्र जे लक्ष्य ठरवले होते त्यापेक्षा जास्त वाढ झाली असल्याचे डॉन या वृत्तपत्राने म्हटले आहे. सेवा क्षेत्रात ५.७ टक्के इतका विकास दर गाठला गेला आहे. कृषी क्षेत्रात ऋण वाढ नोंदली गेली असून ती उणे ०.१९ टक्के आहे, लक्ष्य मात्र ३.९ टक्के ठेवले होते. कापसाच्या उत्पादनाने कृषी अर्थव्यवस्थेस दगा दिला आहे त्यात उणे २७ टक्के वाढ नोंदली गेली. कापसाचे उत्पादन १३.९६ दशलक्ष गासडय़ा इतके अपेक्षित असताना ते १०.१ दशलक्ष गासडय़ा इतके झाले आहे. गेल्या वर्षी ९.५ टक्के वाढीने १३.९ दशलक्ष इतके गासडय़ांचे उत्पादन झाले होते. औद्योगिक क्षेत्राला नवाझ शरीफ सरकारने प्राधान्य दिले असून शेती क्षेत्राची दुर्दशा झाली आहे. अनेक शेती पिकांचे उत्पादन ३.२ टक्के अपेक्षित होते पण ते ७.१८ टक्क्य़ांनी घटले. इतर पिकांचे उत्पादन ४.५ टक्के अपेक्षित होते पण ते ६.२ टक्क्य़ांनी घटले. पशुधन ३.६३ टक्क्य़ांनी वाढले पण ते ४.१ टक्के हे उद्दिष्ट गाठू शकले नाही. मत्स्य उत्पादनात ३.३ टक्के वाढ नोंदली गेली त्यात उद्दिष्ट ३ टक्के होते. औद्योगिक क्षेत्रात ६.४ टक्के वाढ अपेक्षित होती पण ती प्रत्यक्षात जास्त म्हणजे ६.८ टक्के झाली. खाणकामात ६ टक्के उद्दिष्ट होते प्रत्यक्षात ६.८ टक्के वाढ झाली. उत्पादन क्षेत्रात ५ टक्के वाढ झाली. उद्दिष्ट मात्र ६.१ टक्के होते ते गाठता आले नाही. गेल्या वर्षी या क्षेत्रात ३.२ टक्के वाढ झाली होती.