पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याने मुळापासून हादरलेल्या पाकिस्तानने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेत फाशीवरील बंदी तात्काळ उठवली. पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने १३२ विद्यार्थ्यांसह एकूण १४१ जणांचा जीव घेतला. या हल्ल्याचा जागतिक पातळीवर तीव्र निषेध करण्यात येत असतानाच पाकिस्तानमध्ये हल्ल्यामागील दोषींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. निरपराध मुलांचे जीव घेणाऱयांना जगण्याचा कोणताही हक्क नाही, असा आक्रोश सर्वसामान्यांनी व्यक्त केला असून, दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळेच पाकिस्तान सरकारने बुधवारी तातडीने फाशीवरील बंदी उठविली.
क्रौर्याची परिसीमा ठरलेल्या या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येतो आहे. फाशीवरील बंदी उठविण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला असून, पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्याला मान्यता दिली आहे, असे सरकारचे प्रवक्ते मोहिउद्दीन वॅन यांनी सांगितले. या निर्णयामुळे कोणाला फाशी देण्यात येईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
भारतामध्येही श्रद्धांजली
दरम्यान, पाकिस्तानात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना बुधवारी संपूर्ण देशभरात श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन देशातील शाळांना केले होते. त्यानुसार बुधवारी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी पाकिस्तानमध्ये मृत्युमुख पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. संसदेमध्येही दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यावर या हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव वाचण्यात आला आणि त्यानंतर सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.