पनामा पेपर्स प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. शरीफ यांच्याजागी त्यांची मुलगी मरियम किंवा नवाझ शरीफ यांचे भाऊ शहबाज शरीफ यांची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत.

पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. पाच न्यायाधीशांच्या पीठाने शरीफ यांना पंतप्रधानपदावर राहण्यास अपात्र ठरवले. कोर्टाच्या दणक्यानंतर शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. शरीफ यांच्यावर लंडनमध्ये बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप होता. पनामा पेपरप्रकरण समोर येताच सुप्रीम कोर्टाने चौकशीसाठी संयुक्त समिती स्थापन केली होती. १० जुलैरोजी या समितीने अहवाल सादर केला होता. त्यात शरीफ यांच्यावर ठपका ठेवला होता.

शरीफ यांनी सातत्याने पनामा पेपरप्रकरणात निर्दोष असल्याचा दावा केला होता. मात्र शुक्रवारी कोर्टाच्या निकालानंतर शरीफ यांनी राजीनामा दिला अशी माहिती पाकिस्तानमधील पंतप्रधान कार्यालयाने दिली. इस्लामाबादमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून पोलीस आणि सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी शहरात तैनात करण्यात आली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनीदेखील शरीफ यांना सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल स्वीकारुन राजीनामा द्यावा असा सल्ला दिला होता.

नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदी कोणाला संधी मिळणार यावर चर्चा रंगली आहे. नवाझ शरीफ यांचे भाऊ शहबाज शरीफ हे सध्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असून पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम यांचे नावही चर्चेत आहे.पण त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही. तसेच पंतप्रधानपदासाठी त्यांना आधी खासदार म्हणून निवडून यावे लागेल. त्यामुळे शहबाज यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांचे नावही चर्चेत आहे. असिफ हे शरीफ यांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. याशिवाय सरदार अयाझ सादिक यांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे.