पाकिस्तानी रेंजर्सनी रात्रीतून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, तोफगोळ्यांचा मारा करीत स्वयंतचलित शस्त्रांनी त्यांनी गोळीबार केला. जम्मू जिल्ह्य़ातील आर.एस पुरा भागात आंतरराष्ट्रीय सीमेनजीक मोठय़ा प्रमाणात गोळीबार झाल्याचे सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक डी. के. उपाध्याय यांनी सांगितले. काल सहा वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून त्या वेळी सात पाकिस्तानी रेंजर्स व एक दहशतवादी असे आठ जण मारले गेले होते. सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात इतर तीन जण जखमी झाले होते. आंतरराष्ट्रीय सीमेवर रात्री पाकिस्तानने करोतना खुर्द व अब्दुलियन येथे गोळीबार केला.

 

सीमारेषेवरील ४०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

कथुआ : बीएसएफने पाकिस्तानच्या सात जवानांना ठार केल्यानंतर सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानकडून वारंवार मोर्टर बॉम्ब फेकण्याचे तसेच गोळीबाराचे आवाज होत असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून सीमेवरील खेडय़ात राहणाऱ्या ४०० लोकांना बुलेटप्रूफ वाहनांमधून अन्यत्र हलविण्यात आले आहे.  त्यांची सोय जिल्हा प्रशासनाकडून हिरानगरच्या सरकारी शाळांमध्ये करण्यात आली असल्याचे कथुआचे उपायुक्त रमेश कुमार यांनी सांगितले. कथुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सकडून २० ऑक्टोबरपासून सातत्याने शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे.

 

पाकिस्तानी गुप्तहेरास काश्मीरमध्ये अटक

जम्मू : भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या प्रकरणी एका गुप्तहेरास जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्य़ात अटक करण्यात आली असून तो पाकिस्तानचा आहे. त्याने भारतीय सैन्याची तैनाती व हालचाली याबाबत पाकिस्तानला माहिती पुरवली आहे. त्याच्याकडे दोन पाकिस्तानी सीमकार्ड्स सापडली असून भारतीय सुरक्षा दलांच्या आस्थापनांचे नकाशेही सापडले आहेत. जम्मू जिल्ह्य़ातील चांगिया येथे वास्तव्य असलेल्या बोधराज याच्या कारवायांची माहिती लष्करी गुप्तचरांना मिळाली होती. त्याने हेरगिरीच्या कारवाया करून पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पुरवली, असे सांबा क्षेत्राचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक जोगिंदर सिंग यांनी  सांगितले. बोधराज हा आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या जेरडा खेडय़ात संशयास्पद पद्धतीने फिरताना आढळला. पोलिस पथक आल्याचे दिसताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली.