साऱ्या जगाला हादरवून टाकणाऱ्या पेशावरच्या लष्करी शाळेवरील दहशतवादी हल्ल्यामुळे लष्कर-ए-तय्यबासारख्या दहशतवादी संघटनांशी पाकिस्तानच्या असलेल्या धोरणात्मक संबंधांमध्ये काहीही बदल होणार नाही, असे अमेरिकेतील दक्षिण आशियाविषयक विषयांच्या एका तज्ज्ञाने म्हटले आहे.
१०० हून अधिक मुलांचा बळी घेणारा हा शाळेवरील हल्ला कितीही भयानक असला, तरी त्यामुळे पाकिस्तानने काही दहशतवादी गटांशी राखलेल्या संबंधांच्या मूल्याबाबत पाकिस्तानच्या लष्करी डावपेचाबद्दलचे हिशेब बदलतीलच, असे म्हणता येत नसल्याचे कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स (सीएफआर) या संस्थेतील भारत, पाकिस्तान व दक्षिण आशियाचे सीनियर फेलो डॅनियल मार्की यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या विशेषत: लष्कर-ए-तय्यबाशी किंवा तिच्यासारखीच उद्दिष्टे व महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या, पण वेगळ्या नावाने काम करणाऱ्या इतर संघटनांशी अजूनही कायम असलेल्या संबंधांबाबत भारताला चिंता वाटणे साहजिकच आहे. गेल्या सहा-सात महिन्यांत पाकिस्तानचे सैन्य उत्तर वझिरिस्तानात पाकिस्तानी तालिबानशी लढत असतानाही लष्करचा संस्थापक हाफीझ मोहम्मद हा पाकिस्तानमध्ये खुलेपणाने फिरतो आहे, याकडे मार्की यांनी लक्ष वेधले.
असे असले तरी, पाकिस्तानला मदत देताना काही कठोर अटी घालण्याबद्दल मार्की यांनी प्रतिकूल मत व्यक्त केले. पाकिस्तानला अमेरिकेतर्फे आर्थिक मदत सुरूच राहावी, तसेच त्या देशाला पाकिस्तानी तालिबानसारख्या संकटांना तोंड देता यावे यासाठी तंत्रज्ञानविषयक मदतही द्यायला हवी, असे ते म्हणाले.