मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद याच्या नजरकैदेत ३० दिवसांनी वाढ करण्याचे आदेश पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या पुनरावलोकन बोर्डाने दिले आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रांत सरकारच्या विनंतीवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. २४ ऑक्टोबर रोजी सईदच्या नजरकैदेचा कालावधी संपणार आहे.

पंजाब सरकारने दोन दिवसांपूर्वी दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत सईदची नजरकैद वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार, पुनरावलोकन बोर्डाने हा आदेश दिला आहे. जानेवारीपासून सईद स्वतः घरात नजरकैदेत आहे.

हाफिज सईदला मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत तीन सदस्यीय पुनरावलोकन बोर्डासमोर हजर करण्यात आले होते. या बोर्डामध्ये न्या. यावर अली, न्या. अब्दुल सामी आणि न्या. आलिया नीलम यांचा समावेश होता. या बोर्डाने सईदसह त्याचे चार साथीदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद आणि काझी काशिफ हुसैन यांच्या नजरबंदीतही वाढ केली आहे.

२४ ऑक्टोबर रोजी या सर्वांच्या नजरकैदेचा कालावधी संपत आहे. कायद्यानुसार, सरकार कोणत्याही व्यक्तीला विविध आरोपांखाली तीन महिने नजरकैदेत ठेऊ शकते. तसेच न्यायिक समीक्षा बोर्डाच्या मंजूरीनंतरच त्याच्या कैदेत वाढ करु शकते. बोर्डाने गृहसचिवालयांना १९ ऑक्टोबर रोजी आपल्यासमोर हजर होऊन सरकार सईदची नजरकैद का वाढवणार आहे, याबाबत माहिती देण्यात सांगितले होते.