आण्विक पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताने जोरदार प्रयत्न सुरू केले असतानाच पाकिस्ताननेही आपले घोडे दामटायला सुरुवात केली आहे. पाक पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझीझ यांनी रशिया, दक्षिण कोरिया व न्यूझीलंड या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांना तातडीने संपर्क साधून त्यांना पाठिंब्यासाठी गळ घातली आहे. दरम्यान, एनएसजीमध्ये भारताला प्रवेश दिला गेल्यास पाकिस्तानलाही त्याच सन्मानाने प्रवेश देण्यात यावा, अशी आडमुठी भूमिका चीनने आधीपासूनच जाहीर केली आहे.
एनएसजीतील सदस्यत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेपाठोपाठ स्वित्र्झलड आणि मेक्सिको यांनीही भारताला पाठिंबा दर्शवल्याने पाकिस्तानी नेतृत्व अस्वस्थ झाले. त्यांनीही तातडीने हालचाली करत पाकिस्तानलाही एनएसजीत सदस्यत्व मिळावे यासाठी रशिया, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंड या देशांशी संपर्क साधून त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा द्यावा अशी गळ घातली. भारताला एनएसजीचे पूर्णकालीन सदस्यत्व मिळाल्यास दक्षिण आशियात पाकिस्तानविरुद्ध सत्तासंतुलन साधले जाणार आहे. पाकिस्तानचा अण्वस्त्र प्रसार बंदीचा इतिहास प्रश्नांकित असला तरी त्याच्या अर्जाला चीनने पाठिंबा दिला आहे. आण्विक पुरवठादार गटाच्या सदस्यत्वाचा विस्तार करण्याबाबत निर्णय घेताना एनएसजीच्या सदस्य राष्ट्रांनी ‘वस्तुनिष्ठ व भेदभावरहित’ असावे, असे आवाहन पाकिस्तानने केले असून, या गटात आपल्या समावेशाला पाठिंबा मिळवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न पाकिस्तानने वाढवले आहेत.