देशात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून तालिबान्यांसमवेत चर्चा करण्याकामी आपले सरकार गंभीर आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गुरुवारी येथे नमूद केले.यासाठी एक सरकारी समिती नियुक्त करण्यात आली असून तालिबान्यांनी मांडलेल्या मागण्यांसदर्भात ही समिती विचारविनिमय करणार आहे. अर्थात घटनाबाह्य़ मागण्यांचा विचार केला जाणार नाही, असेही शरीफ यांनी स्पष्ट केले. चर्चेच्या माध्यमातून ही समस्या सोडविण्याची सरकारची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. समाजात शांतता आणि सलोखा प्रस्थापित व्हावा यासाठी समोर आलेल्या आव्हानांचा मुकाबला करून आवश्यक ती पावले उचलण्यावर शरीफ यांनी भर दिला. इस्लामच्या शिकवणीतूनच अतिरेकीवाद आटोक्यात आणता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.