पठाणकोट येथे हवाई तळावर दहशतवाद्यांनी अलिकडेच केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानला संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सत्य शोधून काढावे व दहशतवादाचे आव्हान पेलताना त्यावरील लक्ष विचलित होऊ देता कामा नये, असे त्यांनी बजावले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले, की परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी आज पंतप्रधान शरीफ यांना दूरध्वनी केला होता व त्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चाही केली तसेच दहशतवादाचे आव्हान मोडून काढण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी शरीफ यांना सांगितले.
केरी व शरीफ यांच्यात दूरध्वनीवर नेमके काय बोलणे झाले याबाबत विचारले असता ते म्हणाले, की पंजाबमधील पठाणकोट येथे हवाई तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन देशांतील वरिष्ठ पातळीवरची ही चर्चा होती. दोन जानेवारीला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील हवाई तळावर हल्ला केला होता. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने इस्लामाबाद येथे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पठाणकोट हल्लय़ातील सत्य बाहेर काढण्यासाठी केरी यांनी शरीफ यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे पाकिस्तान काय कारवाई करते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.