पाकिस्तानवरील कर्जाचा डोंगर वाढत असल्याने चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाकिस्तानचे महसुली उत्पन्न वाढत नसल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण होऊ नये, म्हणून चीनने प्रयत्न करायला हवेत, असे चीनमधील सरकारी प्रसारमध्यमांनी म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये चीनची मोठी गुंतवणूक असल्याने चिनी माध्यमांनी भीती व्यक्त केली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये चीनने ४६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. मात्र पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने आता या गुंतवणुकीचे काय होणार, असा प्रश्न चीनला सतावतो आहे. ‘पाकिस्तानची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे. जगभरातील देश पाकिस्तानात गुंतवणूक करत आहेत. पाकिस्तानमधील परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढते आहे. मात्र पाकिस्तानवरील कर्जाचे प्रमाण अतिशय मोठे आहे. यासोबतच पाकिस्तानला महसुलाच्या माध्यमातून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे पाकिस्तानात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान कर्जाची परतफेड कशी करणार, अशी शंका निर्माण झाली आहे,’ असे चीनचे सरकारी वर्तमानपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये चीनकडून मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे,’ असे चीनमधील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. कर्जाच्या वाढत्या बोज्याखाली दबलेल्या पाकिस्तानची अवस्था आणखी बिकट होऊन आर्थिक संकट निर्माण होऊ नये, असा चीनचा प्रयत्न आहे. मात्र पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी चीनलाच सहाय्य करावे लागणार आहे. अन्यथा चीनची पाकिस्तानमधील सर्व गुंतवणूक धोक्यात येऊ शकते.

चिनी प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानवर थेट टीका करणे टाळले आहे. पाकिस्तान आणि चीनचे संबंध अतिशय चांगले असल्याने चिनी माध्यमांनी पाकिस्तानवर थेट टीका केलेली नाही. मात्र चिनी माध्यमांनी मंगोलियातील आर्थिक स्थितीची उल्लेख करत धोक्याची घंटा वाजवली आहे. ‘मंगोलियामध्येदेखील अशीच स्थिती निर्माण झाली होती. मागील वर्षी मंगोलियाचा आर्थिक तोटा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १५ टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास परदेशातून कर्ज मिळणदेखील अवघड होते,’ अशा शब्दांमध्ये चिनी माध्यमांनी पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला आहे.

पाकिस्तानचा महसुली तोटा २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.४ टक्के इतका होता, असे पाकिस्तानी माध्यमांनी त्यांच्या वृत्तांमध्ये म्हटले होते. हा तोटा गेल्या ४ वर्षांमधील सर्वाधिक आहे. २०१६-१७ च्या दरम्यान पाकिस्तान सरकार महसुली तोटा सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.८ टक्क्यांपर्यंत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.