पाकिस्तानच्या आदिवासी भागात दहशतवाद्यांना आश्रय मिळत आहे पण त्यांना केवळ दुर्गम भागच नव्हे तर जास्त लोकवस्तीच्या भागातूनही पैसा मिळत आहे. पाकिस्तान, लष्कर ए तोयबा व हक्कानी नेटवर्कवर कारवाई करण्यात कुचराई करीत आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. पाकिस्तानातील दहशतवादी गट हे भारत व अफगाणिस्तानात कारवाया करीत असल्याचे परराष्ट्र खात्याने कंट्री रिपोर्ट्स ऑन टेररिझम २०१५ या अहवालात म्हटले आहे. या अहवालास अमेरिकी काँग्रेसने मंजुरी दिली आहे. २०१५ मध्ये हक्कानी नेटवर्कसह अन्य दहशतवादी गटांनी संघराज्य आदिवासी भागातून तसेच पाकिस्तानच्या अफगाणिस्तानलगतच्या वायव्य सीमेवरील भागातून कारवाया केल्या आहेत. लष्कर ए तोयबा याच्याशी संबंधित जमात उद दवा, फलाह ए इन्सानियत फाउंडेशन या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानात मेळावे घेण्यासाठी निधी उभा करण्यात यश येत होते असेही अहवालात म्हंटले आहे.