भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना त्वरीत फाशी देण्याची मागणी करणारी याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने रविवारी फेटाळली आहे. फारूक एच. नायिक नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. जाधव यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांनी या शिक्षेविरोधात याचिकाही दाखल केलेली नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ फाशी देण्यात यावी, अशी याचिका नायिक याने दाखल केली होती. कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंड आणि राजनैतिक संपर्क न साधण्याचा निर्णय पाकिस्तानी कायद्यानुसार देण्यात आला होता, असेही याचिकाकर्त्याने म्हटले होते.

हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकारातंर्गत येत नाही. पाकिस्तान आपल्या देशांतर्गत कायद्यानुसार कारवाई करण्यास स्वतंत्र आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या प्रकरणी अंतिम निर्णय होईपर्यंत पाकिस्तानने त्यांना फाशी देऊ नये असे म्हटले आहे. या निर्णयाचे भारतात स्वागत करण्यात आले होते. तर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाचा जाधव यांच्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा काहीच परिणाम होणार नसल्याचे म्हटले होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे रोजी पाकिस्तानला झटका देत अंतिम निर्णय येईपर्यंत जाधव यांना फाशी देऊ नये असे म्हटले आहे.

जाधव यांनी इराणमधून बलुचिस्तान प्रांतात प्रवेश केल्यानंतर सुरक्षा दलांनी गेल्या वर्षी ३ मे रोजी त्यांना अटक केली, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र, जाधव हे व्यापारानिमित्त इराणला गेले असताना त्यांचे तेथून अपहरण करण्यात आले, या म्हणण्यावर भारत ठाम आहे.