नवाझ शरीफ सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे पाकिस्तानमधील नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्याने खळबळजनक आरोप केले आहेत. खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात, असा आरोप आयेशा गुलालई यांनी केला आहे. आरोपांनंतर गुलालई यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे.

इम्रान खान हे पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख आहेत. ते चारित्र्यहिन असल्याचा खळबळजनक आरोप पक्षाच्या नेत्या गुलालई यांनी केला. पक्षातील इतर महिला नेत्यांचाही छळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, पक्षाने त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. गुलालई यांनी पैशांसाठी मुस्लिम लीग-नवाझ या पक्षाला आपला ‘आत्मा’ विकला आहे, असा गंभीर आरोप पक्षाने केला आहे. गुलालई यांनी पत्रकार परिषद घेऊन खान यांच्यावर आरोप केले आहेत. पक्षातील महिला नेत्या सुरक्षित नाहीत. माझा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. सन्मान आणि अब्रूचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी मी कोणताही समझोता करू शकत नाही, असेही गुलालई म्हणाल्या.

इम्रान खान हे पक्षातील महिला नेत्यांना अश्लिल मेसेज पाठवतात, असा आरोपही त्यांनी केला. खान हे मानसिक आरोग्याच्या तक्रारींमुळे त्रस्त आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी खैबर पख्तूनख्वातील तहरीक – ए- इन्साफ पक्षाचे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. पक्षाला सोडचिठ्ठी देतानाच त्यांनी आपण पीएमएलएनमध्ये प्रवेश करणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्याचवेळी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचेही कौतुक केले. शरीफ भ्रष्टाचारी असू शकतात, पण महिलांचा आदर ते करतात, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी आयशा गुलालई यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. पैशांसाठी त्या अशा प्रकारचे आरोप करत आहेत. त्यांनी आपला आत्मा पीएमएलएन या पक्षाला विकला आहे, असा आरोपही त्यांनी केला.