बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री हल्ला चढवला. या हल्ल्यात आतापर्यंत ६० जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी आणि असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेने दिली आहे. प्रशिक्षण केंद्रातील वसतिगृहाच्या समोरच्या प्रवेशद्वारातून दहशतवादी आत आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. दहशतवाद्यांनी प्रथम दोन स्फोट केले. त्यानंतर गोळीबाराला सुरूवात केली. यामध्ये अनेक जण ठार झाले. गोळीबारापासून वाचण्यासाठी काहींनी इमारतीवरून उडी मारल्याने तर काहीजण भिंत चढताना जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांनी काहीजणांना ओलीस म्हणून धरल्याची शक्यता आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, हल्ल्यात प्रशिक्षण केंद्रातील ५१ प्रशिक्षणार्थी जखमी झाले असून यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. यावेळी झालेल्या चकमकीत दोन पोलीस आणि तीन दहशतवादीही मारले गेले आहेत. दरम्यान, आतापर्यंत प्रशिक्षण केंद्रातील ६०० प्रशिक्षणार्थींपैकी २०० जणांची सुटका करण्यात आली आहे. डॉन या वृत्तपत्राच्या माहितीनुसार, पाच ते सहा दहशतवाद्यांनी काल रात्री ११.३० च्या सुमारास पोलीस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला चढवला. हे केंद्र क्वेट्टाच्या सरीब रोड येथे आहे. या घटनेपूर्वी १४५ किलोमीटर अंतरावरील एका गावात कस्टमच्या दोन अधिकाऱ्यांना ठार मारण्यात आले होते. तर तिसरा अधिकारी जखमी झाला होता.
हल्लेखोर हे अफगाणिस्तानमधील काहीजणांशी संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. अल-कायदाशी संलग्न असलेल्या लष्कर-ए-झांघवी या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध असण्याची शक्यता असल्याची माहिती निमलष्करी दलाचे प्रमुख मेजर जनरल शेर अफगाण यांनी दिली.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार  इम्रान खानने ट्विटरच्या माध्यमातून हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.