विविध क्षेत्रांत विकास साधून चीनचे पाकिस्तानशी सर्व क्षेत्रांत असलेले संबंध बळकट केले जातील, असे सांगून आपला पाकिस्तानचा पहिला दौरा म्हणजे आपल्या ‘सख्ख्या भावाच्या’ घरी भेट देणे आहे, असे उद्गार चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी रविवारी काढले.
हा माझा पाकिस्तानचा पहिलाच दौरा असला तरी जणू काही मी माझ्या भावाच्या घरीच जात असल्याचे मला वाटत आहे. या भेटीत द्विपक्षीय सहकार्याचा आराखडा ठरवण्यासाठी, चीन-पाकिस्तान दरम्यानच्या ४६ अब्ज डॉलर गुंतवणुकीच्या आर्थिक मार्गात भरीव प्रगती करण्यासाठी, तसेच इतर क्षेत्रांमध्ये वास्तविक सहकार्य करण्यासाठी पाकिस्तानी नेत्यांसोबत काम करण्याची मी वाट पाहात आहे, असे चिनी अध्यक्षांनी पाकिस्तानी माध्यमातील एका लेखामध्ये म्हटले आहे. झिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने जिनपिंग यांच्या स्वाक्षरीने हा लेख जारी केला आहे.
इंडोनेशियातील बांडुंग परिषदेला हजर राहण्यापूर्वी सोमवार व मंगळवारी पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पाकचे अध्यक्ष ममनून हुसेन, पंतप्रधान नवाझ शरीफ व इतर पाकिस्तानी नेत्यांना भेटून द्विपक्षीय संबंधांबाबत विचारांचे आदानप्रदान करतील, तसेच सामायिक हिताच्या मुद्दय़ांवर चर्चा करतील.