पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरुच असून मंगळवारी पेशावरमधील न्यायालयाच्या आवारात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवले आहेत. आत्मघाती हल्लेखोरांनी हा स्फोट घडवला असून हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पेशावरमधील चरसड्डा जिल्ह्यातील न्यायालयाच्या आवारात तीन आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर किमान ३० जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर न्यायालयाच्या परिसराला सुरक्षा यंत्रणांनी वेढा घातला आहे. न्यायालयाच्या आवारात गोळीबाराचा आवाजही येत होता. त्यामुळे घटनास्थळी चकमक सुरु असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हल्ला करणा-या तिन्ही दहशतवाद्यांचा ठार मारण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तालिबानमधील जमात ऊर अहरार या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील लाल शहबाज कलंदर दर्ग्यावरआत्मघातकी हल्ला झाला होता. यामध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी लाहोरमध्ये औषध विक्रेत्यांच्या आंदोलनादरम्यान हल्ला झाल्याची घटना घडली होती. लागोपाठ होणा-या दहशतवादी हल्ल्यांमुळे पाकिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाकिस्तानमधील सुफी दर्गावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रे अफगाणिस्तानमधून हलवण्यात आल्याचे निवेदन पाक लष्कराने दिल्यानंतर काही वेळातच अफगाणिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. अफगाणिस्तानमधील दहशतवादी तळांवर पाक सैन्याने हल्ला केला होता