जम्मू-काश्मीरमध्ये अखनूर येथे पाकिस्तानी सैन्याने भारतीय छावण्या व नागरी भागात पुन्हा उखळी तोफांनी मारा केला आहे, यात प्रत्यक्ष ताबा रेषेवर मोठय़ा प्रमाणात मशीन गन्सचाही वापर करण्यात आला आहे. दोन्ही बाजूने प्राणहानी व वित्तहानीचे वृत्त नाही. पहाटे ३.३० वाजता सुरू झालेला गोळीबार सकाळी सहा वाजता संपला. भारतीय जवानांनी सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमेवर उखळी तोफांचा मोठय़ा प्रमाणात मारा करण्यात आला. आरपीजी व इतर शस्त्रांच्या मदतीने गोळीबार करण्यात आल्याचेही वृत्त आहे. अखनूर तहशिलात पालनवाला भागात तसेच चांब क्षेत्रात गोळीबाराच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. पोलीस व पाकिस्तानी सैन्य दलांनी बाडू व चानू या खेडय़ांना लक्ष्य केले. प्रत्यक्ष ताबा रेषेवर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सीमेवरील काही रहिवासी त्यांच्या गाईगुरासंह परत जात असताना पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला. २००४ मध्ये दोन्ही देशात शस्त्रसंधीचा करार झाला होता. पाकिस्तानी सैन्याने गेल्या चार दिवसात प्रत्यक्ष ताबा रेषेवर काश्मीरमध्ये पाचव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने सीमेपलीकडून गोळीबार वाढवला असून भारताने लष्कराच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडक दहशतवादी छावण्यांवर हल्ले केल्यानंतरच्या काळात पाकिस्तानचा सीमेवरील गोळीबार वाढला आहे. काल पाकिस्तानी तुकडय़ांनी पालनवाला, चाप्रियाल, समनाम या अखनूर क्षेत्रातील भागात रात्री गोळीबार केला होता, असे जम्मूचे उपायुक्त सिमरणदीप सिंग यांनी सांगितले.