सिंधू पाणी वाटप करार मोडला तर भारताला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पाकिस्तानकडून भारताला देण्यात आला आहे. सिंधू पाणी वाटप करारबाबत घडणाऱ्या घडामोडींकडे पाकिस्तानचे लक्ष असल्याची माहिती पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ताने दिली आहे. ‘जर भारताकडून सिंधू पाणी वाटप करार मोडायचा प्रयत्न झाला तर पाकिस्तान जशास तसे प्रत्युत्तर देईल’, असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस जकारिया यांनी म्हटले आहे.

भारताकडून ५६ वर्ष जुना सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये आहे. दोन्ही देशांमधील बिघडलेले संबंध लक्षात घेता भारत हे पाऊल उचलू शकतो, असे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यामुळेच परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेत पाकिस्तान सरकारची बाजू स्पष्ट केली आहे.

काश्मीरच्या मुद्यावरुन जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी भारताकडून सिंधू पाणी वाटप कराराचा वापर केला जातो आहे, असा आरोप जकारिया यांनी केला आहे. ‘काश्मिरी लोकांवर भारतीय सैन्यावर अत्याचार केले जात आहेत. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात मानवाधिकारांचे उल्लंघन होते आहे,’ अशा शब्दांमध्ये जकारियांनी भारतविरोधी राग आळवला आहे. काश्मीरचा मुद्दा जागतिक स्तरावर नेऊन भारताचा खरा चेहरा पाकिस्तानकडून जगासमोर आणला जात असल्यानेच भारताने सिंधू पाणी वाटप कराराचा पुनर्विचार सुरू केला आहे, असेही जकारिया यांनी म्हटले आहे.

याआधी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनीदेखील सिंधू पाणी वाटप करारावरुन भारतविरोधी राग आळवला होता. ‘भारताने हा करार रद्द केल्यास पाकिस्तान हा मुद्दा संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेईल. हा करार मोडीत काढणे म्हणजे युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल,’ असे अजीज यांनी म्हटले आहे. ‘आंतरराष्ट्रीय नियमांनुसार भारत हा कायदा एकतर्फी रद्द करु शकत नाही. हा करार एकतर्फी रद्द करण्याला दोन्ही देशांमध्ये युद्ध घडवण्यासाठी उचललेले पाऊल समजण्यात येईल,’ असे अजीज यांनी पाकिस्तानी संसदेला संबोधित करताना म्हटले आहे.

‘सिंधू पाणी वाटप करार एकतर्फी रद्द केला जाणे ही पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा असेल. भारताने हा करार मोडीत काढल्यास पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईल. भारताचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय शांततेचा भंग करणारे ठरवले जाईल. त्यामुळे पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जाण्यासाठी एक चांगले कारण मिळेल’, अशा शब्दांमध्ये अजीज यांनी सिंधू पाणी वाटप करारबद्दल बोलताना पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली आहे.