मौलाना मसूद अझहरच्या ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने आता पाकिस्तानमध्ये निधी संकलनाची मोहीमच सुरु केली आहे. पाकिस्तानमधील जमीन मालकांनी इस्लामसाठी बलिदान देणाऱ्या आणि तुरुंगात असलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना मदत करावी असे आवाहन मौलाना मसूद अझहरने केले आहे.

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे ‘अल कलम’ हे मासिक असून या मासिकात जैशच्या अल रेहमत ट्रस्टतर्फे एक जाहिरात देण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये जमीन मालकांनी त्यांच्या उत्पन्नातील ठराविक भाग हा धर्मासाठी द्यावा असा नियम होता. २०१३ च्या ऑडीट रिपोर्टनुसार १९९० पासून अशा स्वरुपाचा निधी जमा करण्यात आला नव्हता. पण आता जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने याच नियमाचा आधार घेत दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.

‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा पठाणकोट, नागरोटा, गुरुदासपूर आणि अखनूर या हल्ल्यांमागे हात होता. तसेच मझर ए शरीफमधील भारतीय दुतावासावरील हल्ल्यातही या संघटनेचा सहभाग होता. त्यामुळे ‘जैश’च्या या मोहीमेनंतर भारतातील गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ‘जैश’चे नेते पंजाब प्रांतातील गावांमधील दर्गामध्ये प्रचार करत असून यात स्थानिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मसूद अझहरला गेल्या वर्षी पाकिस्तानमधील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण त्यानंतर जैश ए मोहम्मद आणखी सक्रीय झाल्याचे समजते. दुसरीकडे मसूद अझहरविरोधात सुरु असलेली तपास मोहीम आता थंडावली आहे.

कंदहार विमान अपहरण प्रकरणात अपहरणकर्त्यांच्या मागणीमुळे मसूद अझहर आणि आणखी दोघा दहशतवाद्यांची भारताला सुटका करावी लागली होती. यानंतर पाकिस्तानमध्ये जाऊन मसूद अझहरने जैश-ए-मोहम्मद ही अतिरेकी संघटना स्थापन केली. मसूद अझहरचे तालिबान तसंच अल-कायदाशीही संबंध असल्याचा दावा केला जातो.