पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याच्या गोळीबारामुळे पाकिस्तानी लष्कराचे एक वाहन नदीत वाहून गेल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. या अपघातात चार सैनिकांचा बुडून झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. मात्र भारतीय लष्कराने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येते आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाते आहे. रविवारीदेखील पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. ‘नियंत्रण रेषेजवळून जात असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या वाहनाला भारतीय सैन्याने लक्ष्य केले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि वाहन नदीत कोसळले. यामुळे चार सैनिकांचा बुडून मृत्यू झाला,’ असे पाकिस्तानी लष्कराने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले.

भारतीय लष्कराच्या गोळीबारामुळे वाहन नदीत कोसळल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. वाहनातील एका सैनिकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून इतर मृतदेहांचा शोध सुरु आहे, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. नोव्हेंबरमध्येही भारतीय सैन्याने नागरिकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला लक्ष्य केल्याने १२ जणांचा मृत्यू झाला होता, असेही पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘भारताकडून केल्या जात असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले जात आहे,’ अशी माहिती पाकिस्तानी लष्कराकडून देण्यात आली आहे.

मे महिन्यात पाकिस्तानी सैन्याने भारताच्या दोन जवानांची हत्या करत त्यांच्या मृतदेहांची विटंबना केली होती. पाकिस्तानच्या बॅटने (बॉर्डर अॅक्शन टीम) भारतीय जवानांची हत्या केली होती. मात्र भारतीय सैन्याचा हा दावा पाकिस्तानने फेटाळला होता. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले नसल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जाते असल्याचे भारतीय सैन्याने म्हटले आहे. दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करत असताना त्यांना कव्हर फायरिंग देऊन पाकिस्तानी सैन्य घुसखोरीला प्रोत्साहन देत असल्याचे भारताने म्हटले आहे.