पाकिस्तानच्या सागरी हद्दीत मासेमारी करताना अटक झालेल्या ३५० भारतीय मच्छीमारांना सोडण्याचे निर्देश पाकमधील न्यायालयाने दिले आहे. या मच्छीमारांना पुन्हा भारताच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करावी असे न्यायालयाने म्हटले आहे.

पाकिस्तानने जानेवारीपासून पकडलेल्या ३५० मच्छीमारांबाबत पाकिस्तानमधील न्यायालयात सुनावणी झाली. मच्छीमारांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल झाला होता. मच्छीमारांनी स्वतःची चूक मान्य केली होती. न्यायालयाने या सर्व मच्छीमारांना दोषी ठरवले. न्यायाधीश सलमान अमजद सिद्दीकी यांनी या मच्छीमारांना शिक्षाही सुनावली. निकालापूर्वीच मच्छीमारांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्याने त्यांना सोडून द्यावे असे न्यायाधीशांनी सांगितले. या सर्वांना भारताच्या ताब्यात देण्याची प्रक्रीया सुरु करावी आणि त्यांना मायदेशी पाठवावे असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीशांनी मच्छीमारांना शिक्षा देताना फार कठोर भूमिका घेणे टाळल्याचे वकीलांनी सांगितले. कारागृह प्रशासनाने त्यांना मायदेशी जाण्यासाठी सोय करुन द्यावी असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानमध्ये जानेवारी ते मे या कालावधीत भारतीय मच्छीमारांच्या ६० हून अधिक बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. या मच्छीमारांविरोधात सागरी हद्द ओलांडून बेकायदेशीररित्या पाकमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच मच्छीमारांची सुटका होणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.