दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या अधिकाऱ्याचे नाव मोहम्मद अख्तर आहे. वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या अधिकाऱ्याकडे सैन्याशी संबंधित गोपनीय कागदपत्रे सापडली आहेत. पोलिसांनी ही कागदपत्रे हस्तगत केली आहेत. हेरगिरीचा संशय असलेला पाकिस्तानी अधिकारी मोहम्मद अख्तरची चौकशी करण्यात आली आहे. यानंतर गृह मंत्रालयाने मोहम्मद अख्तरला तातडीने देश सोडून देण्याचे आदेश दिले आहेत.

मोहम्मद अख्तरला मदत करणाऱ्या दोन लोकांनादेखील अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे रमजान आणि सुभाष अशी सांगितली जात आहेत.

एकीकडे पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीरच्या अब्दुल्लिया क्षेत्रात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. यासोबत या गोळीबारात ६ स्थानिक लोक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरुन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याकडे निषेध नोंदवला आहे. ‘पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील व्यक्तींना राजदूतांना असणारे संरक्षण असते. त्यामुळे मोहम्मद अख्तरला अटक करता येणार नाही. मात्र सरकारने मोहम्मद अख्तरला देश सोडण्यास सांगितले आहे,’ असे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे.

भारताने याआधी पाकिस्तानकडून २५-२६ ऑक्टोबरला चापरार आणि हरपाल सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबाराचा निषेध नोंदवला होता. तर पाकिस्तानने भारतावर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आरोप केला होता. भारताकडून झालेल्या गोळीबारात दोन नागरिक मारले गेल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला होता.

राजौरी आणि नौशेरा सेक्टरमध्ये लहान शस्त्रांसह पाकिस्तानच्या सैन्याने गोळीबार केला, असे भारताने मंगळवारी म्हटले होते. पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आले होते. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते. गेल्या महिन्यात १८ सप्टेंबरला उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर खवळलेल्या पाकिस्तानी सैन्याने आतापर्यंत ४२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.