पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीचे नेमके कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

वास्तविक बासीत हे एप्रिल २०१८ मध्ये निवृत्त होणार होते. परंतु त्यांनी निवृत्तीसाठी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे विनंती अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज पंतप्रधानांनी स्वीकारला आहे. परराष्ट्र सचिव पदावर तेहमिना जानजुआ यांच्या नियुक्तीमुळे बासीत यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच त्यांनी मुदतपूर्वीच राजीनामा दिला असावा, असा अंदाज आहे. कारण तेहमिना या बासीत यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत. २०१४ मध्ये भारतात उच्चायुक्त म्हणून नियुक्त झाले होते. बासित यांनी भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण केला आहे.

मागील आठवड्यात बासित यांनी भारत-चीन यांच्यात सुरू असलेल्या डोकलाममधल्या वादात उडी घेण्याचा प्रयत्न केला होता. या वादादरम्यान बासित यांनी चीनचे उच्चायुक्त लू झाओहुई यांची भेट घेतली. इतकेच नव्हे तर बासित लवकरच भूतानचे उच्चायुक्त वेटसॉप नमगेल यांचीही भेट घेणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे बासित हे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले होते.