पाकिस्तानातील हिंदूूसमुदायाने पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे दिवाळीची सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी केली आहे व सणानिमित्त खास योजना जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
पाकिस्तान हिंदू कौन्सिलचे प्रमुख डॉ.रमेश कुमार वनकवानी यांनी सांगितले की, समाजातील तुटलेपणा दूर करण्यासाठी दिवाळीची सुटी जाहीर करण्यात यावी. आम्ही देशभक्त पाकिस्तानी आहोत. आमच्या वार्षिक सणाला सार्वजनिक सुटी मिळाली हा आमचा घटनात्मक अधिकार आहे.
वनकवानी यांनी सांगितले की, नॅशनल असेंब्लीत आपण हा विषय मांडणार आहोत. पाकिस्तानात अल्पसंख्य समुदायाचे प्रश्न सोडवण्यात कुठल्याही राजकीय पक्षाला रस नाही. मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, मॉरिशस, गयाना, त्रिनिदाद, टोबॅगो, सुरीनाम, सिंगापूर, फिजी, भारत, बांगलादेश या देशात दिवाळीची सुटी असते. पाकिस्तानात दिवाळीला जे लोक कार्यालयात येत नाहीत त्यांची रजा लावली जाते. दिवाळी २३ऑक्टोबरला साजरी होत आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीने प्रत्येक हिंदू प्रतिनिधींना दिवाळीनिमित्त वाटण्यासाठी १० लाख रूपयांचे पॅकेज दिले होते. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाने ही परंपरा कायम ठेवावी अशी आमची अपेक्षा आहे. अनुसूचित जाती हक्क चळवळीचे पाकिस्तानतील अध्यक्ष व संचालक हरे रामा फाउंडेशनचे संचालक रमेश जयपाल यांनी सांगितले की, हिंदूना आपण समाजाचे भाग आहोत असे वाटायचे असेल तर त्यांना दिवाळीची सुटी जाहीर केली पाहिजे. हिंदू गुरू सुखदेव जी यांनी सांगितले की, दिवाळी प्रेमाचा व बंधुत्वाचा संदेश देते त्यामुळे या निमित्ताने तो संदेश सरकारने पसरवावा. मुस्लिम व ख्रिश्चनांनी या सणात सहभागी व्हावे.