मरियम मसूद आणि इरम मसूद या दोन सख्या बहिणी. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये वैमानिक म्हणून कार्यरत असलेल्या या दोघींनी बोईंग ७७७ हे उच्च प्रवासीक्षमतेचे विमान चालवून इतिहास रचला आहे.

मरयम मसूद आणि इरूम मसूद यांनी याआधी वेगवेगळी विमानांत वैमानिक म्हणून काम केले. मात्र, त्यांना एकाच विमानाचे सारथ्य करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, या दोघींना बोईंग ७७७ विमानात ही संधी मिळाली आणि त्यांनी इतिहास रचला, असे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे प्रवक्ते दन्याल गिलानी यांनी सांगितले.

याआधी कोणत्याही दोन सख्या बहिणींनी एकत्रितपणे बोईंग ७७७ विमान चालविल्याची नोंद नाही. अलीकडेच इरमला बोईंग ७७७ विमानात वैमानिक म्हणून संधी मिळाली होती. आता मरियमलाही या विमानात इरमसोबत वैमानिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तोटा सहन करीत असलेल्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्ससाठी ही आनंदाची गोष्ट असल्याचे गिलानी यांनी म्हटले आहे.