भारताशी सलोख्याचे, विश्वासाचे संबंध प्रस्थापित करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे सातत्याने सांगणारे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पुढील आठवडय़ात काठमांडूत होणाऱ्या सार्क शिखर परिषदेच्या वेळी मात्र भारताने पुरविलेल्या बुलेटप्रूफ गाडय़ा वापरण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी आपण स्वत:चे वाहन आणू, असेही शरीफ म्हणाले.
नवाझ शरीफ हे स्वत:ची बुलेटप्रूफ गाडी आणणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते खगनाथ अधिकारी यांनी सांगितले. यजमान देश या नात्याने आम्ही सार्क परिषदेत सहभागी होणाऱ्या सर्व नेत्यांच्या वास्तव्याची, वाहतुकीची, भोजनाची व्यवस्था केली आहे. तरीही एखाद्या नेत्याला स्वत:चे वाहन आणण्याची इच्छा असल्यास त्याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही, असे अधिकारी यांनी स्पष्ट केले.
काठमांडूत २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सार्क परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरीफ हे स्वत:ची वाहने आणणार आहेत, असे कळते. मात्र अन्य कोणत्याही नेत्याने स्वत:चे वाहन आणण्याबाबत आम्हाला कळविलेले नाही, असेही अधिकारी म्हणाले.
सार्क नेत्यांच्या वाहतुकीची व्यवस्था चोख असावी यासाठी भारताने विशेष बुलेटप्रूफ गाडय़ा उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा सहा विशेष बुलेटप्रूफ गाडय़ा रविवारीच काठमांडूत आल्या आहेत. या परिषदेला अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, श्रीलंका या देशांचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. मात्र शरीफ यांच्या या कृतीमुळे त्यांच्या हेतूंबाबत भुवया उंचावल्या जात आहेत.