पाकिस्तानच्या जहाजामुळे खोल समुद्रात जिहादचा धोका उद्भवू शकतो, असे मत नौदलप्रमुख आर. के. धोवन यांनी व्यक्त केले आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता याकडे धोवन यांनी अंगुलीनिर्देश केला आहे.
सागरी दहशतवादाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मुकाबला करण्यास नौदल सिद्ध आहे. पाकिस्तानच्या जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला, त्याची भारताने गंभीर दखल घेतली आहे, असेही धोवन म्हणाले.
पाकिस्तानच्या जहाजाचे अपहरण करून त्याद्वारे अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करण्याची योजना होती, असे एका अहवालात म्हटले आहे, तर दुसऱ्या अहवालानुसार भारतीय जहाजावर हल्ला करण्याची योजना असल्याचे म्हटले आहे.