‘पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मेहमूद अख्तर भारतीय सैन्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळवत होता. संरक्षण क्षेत्राशी संबंधित असलेली गोपनीय माहिती मिळवून २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी अख्तर कार्यरत होता,’ अशी धक्कादायक माहिती गृह मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

‘पश्चिम किनारपट्टी, गुजरातमधील खाडी परिसर आणि कच्छ भागातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती मिळवण्याचे प्रयत्न महमूद अख्तरकडून सुरू होते. पाकिस्तानच्या आयएसआयला पुन्हा एकदा भारतात दहशतवादी पाठवयाचे असल्याने अख्तरकडून सुरक्षा यंत्रणेशी संबंधित गोपनीय माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. याबद्दलची माहिती आम्हाला गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली आहे. अख्तरकडून पश्चिम किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्थेची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. यावरुन २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याचे आयएसआयचे मनसुबे असल्याची बाब अधोरेखित होते,’ अशी माहिती गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

‘महमूद अख्तरला मौलाना रमझान आणि सुभाष जांगिरकडून मदत केली जात होती. गुजरातमधील खाडीचा भाग आणि कच्छ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची माहिती या दोघांकडून अख्तरला दिली जात असताना या दोघांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी अधिकाऱ्याकडून याबद्दल या दोघांना ५० हजार रुपये दिले जाणार होते,’ अशी माहितीही गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

राजनैतिक अधिकाराचे कवच मिळण्याआधी अख्तरने दिल्ली पोलिसांना काही महत्त्वपूर्ण माहिती दिली. गुप्तहेरांच्या साखळीतील आपली भूमिका अख्तरने पोलिसांना सांगितली. दिल्ली पोलिसांनी या सगळ्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. आपण एक वर्षापेक्षा अधिक काळ गुप्तहेर साखळीचा भाग होतो, अशी कबुली अख्तरने पोलिसांकडे दिली आहे.

मेहमूद अख्तरने त्याच्या चौकशीत पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील काही अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख केला. याच अधिकाऱ्यांना अख्तर गोळा केलेली माहिती पुरवत होता. मात्र याबद्दल कोणतेही ठोस पुरावे नसल्याने पोलिसांना कोणतीही कारवाई करता आलेली नाही.

दिल्ली पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मेहमूद अख्तरला ताब्यात घेतले. याचवेळी रमझान आणि जांगिरलादेखील अटक करण्यात आली. दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयातून या तिघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी राजस्थानातील विसा एजंट असणारा शोएब पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र शोएबला शुक्रवारी जोधपूरमधून अटक करण्यात आली.