पाकिस्तानकडून मंगळवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्यांनी राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील लष्कराच्या चौक्यांवर उखळी तोफांचा मारा व गोळीबार केला. भारतील लष्करानेही त्यांना प्रत्युत्तर दिले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.
पाकिस्तानने सोमवारी रात्री साडेआठ ते मध्यरात्री दीडपर्यंत नौशेरा येथील लाम बटालियन भागात भारतीय चौकीवर ८२ मिमीच्या उखळी तोफांचा मारा आणि स्वंयचलित शस्त्रांनी गोळीबार केला. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने आतापर्यंत २९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. रविवारी नौशेरा आणि राजौरी सेक्टरमध्ये दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यात एक जवान शहीद झाला होता. आठ ऑक्टोबर रोजी पुंछ जिल्ह्यात मेंधर कृष्णागती सेक्टरमध्ये भारतीय चौकीवर गोळीबार केला होता. यात एक जवान जायबंदी झाला होता. पाकिस्तानी सैनिकांनी पाच ऑक्टोबर रोजी तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.