संपन्न अशा कराची शहराचे नियंत्रण एका प्रभावी राजकीय पक्षाकडून आपल्याकडे खेचून घेण्यासाठी पाकिस्तानच्या मुख्य गुप्तचर संस्थेचे प्रमुख सध्या मोहीम चालवत आहेत. नागरी जीवनात लष्कराचे हे अगदी ताजे आणि काहींच्या मते सगळ्यात धीट आक्रमण आहे.
लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी आणि पारंपरिकरीत्या कराचीवर आधिपत्य राखलेल्या मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) संघटनेचे सदस्य यांच्या सांगण्यानुसार, आयएसआयचे प्रमुख रिझवान अख्तर यांनी कराचीवर लक्ष केंद्रित केले आहे. लष्कराकरवी कराचीचा ताबा मिळवण्याचे प्रयत्न शांततेने, पण सातत्याने सुरू असल्याचे अख्तर यांच्या निकटच्या एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. आयएसआयकडे पाक लष्कराची विस्तारित शक्ती म्हणून पाहिले जाते.
कराची हे फार मोठे शहर आहे. येथे विपुल जमीन, संपन्न उद्योग व स्रोत आहेत. यापुढे कुठल्याही एका पक्षाला कराचीवर सत्ता गाजवण्याची मुभा दिली जाणार नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानातील सगळ्यात मोठे आणि श्रीमंत शहर असलेल्या कराचीत देशाच्या महसुलापैकी निम्मा गोळा होतो.
लष्कराचे कराचीवरील आक्रमण २०१३ सालच्या अखेरी सुरू झाले, त्या वेळी खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आणि छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह रस्त्यांवर फेकले जाऊ लागले. गेल्या महिन्यात तीव्र झालेली ही मोहीम अधिकृतरीत्या गुन्हेगार व दहशतवादी यांच्याविरुद्ध असली, तरी काही जणांच्या मते एमक्यूएम हे तिचे मुख्य लक्ष्य आहे. एमक्यूएमची, विशेषत: तिचा हद्दपार नेता अल्ताफ हुसेन याची कराचीवरील पकड दुबळी झाल्यास लष्कराबाबत सहानुभूती असलेल्या राजकीय पक्षांना वाढीसाठी वाव मिळणार आहे.