दहशतवाद्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून ते कुठल्याही प्रकारची दया दाखवण्यास पात्र नाहीत, असे पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी म्हटले आहे. प्रामुख्याने मुलांसह १४८ जणांचा बळी घेणाऱ्या पेशावरच्या लष्करी शाळेवरील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
देश आता दहशतवाद्यांविरुद्ध एकजूट झाला असून, हे लोक दया दाखवण्यास पात्र नसल्यामुळे त्यांना कुठलीही सूट देऊ नये असे नागरिकांना वाटते. तालिबानने सर्व मर्यादा ओलांडल्या असून ते सुधारण्याच्या पलीकडे गेले आहेत, मात्र त्यांची शिक्षेपासून सुटका होणार नाही, असे हुसेन यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर सांगितले.
सध्या दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेली झर्ब-ए-अझ्ब ही मोहीम तार्किक निष्कर्षांपावेतो येईपर्यंत सुरू राहील, तसेच दहशतवादाच्या प्रकरणांची सुनावणी जलदगतीने होण्यासाठी आणि साक्षीदारांना संरक्षण पुरवण्यासाठी नवे कायदे तयार केले जातील, असे ते म्हणाले. देशातील दहशतवादाशी लढण्याकरता पाकिस्तान व अफगाणिस्तान एकमेकांशी सहकार्य करत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.