पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा भारताला धमकावले आहे. भारताने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला पूर्ण ताकदनिशी उत्तर द्या असे निर्देश बाजवा यांनी पाक सैन्याला दिले आहेत.

लष्करप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर शुक्रवारी कमर बाजवा यांनी पहिल्यांदाच रावळपिंडीधील सैनिकांना संबोधित केले. सीमा रेषेवर भारताने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर द्या असे त्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान बाजवा यांना सीमा रेषेवरील परिस्थितीची माहितीदेखील देण्यात आली. भारताने केलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि त्यावर पाकिस्तानने दिलेले प्रत्युत्तर याची त्यांनी माहिती घेतल्याचे पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या अत्याचारांवरुन जगाचे लक्ष अन्य मुद्द्याकडे नेण्यासाठी भारत सीमा रेषेवर आक्रमक झाला आहे अशी टीकाही त्यांनी केली. काश्मीरमधील जनतेच्या भावना आणि शांततेसाठी संयुक्त राष्ट्राच्या निर्देशाप्रमाणे काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबाराला जशास तसे उत्तर द्या असे सांगतानाच सीमा रेषेवरील सतर्कता वाढवा अशी सुचनादेखील त्यांनी सैनिकांना केली.

पठाणकोट, उरी आणि आता नागरोटा येथे लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाचे आहेत. उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. मात्र त्यानंतरी सीमा रेषेवर पाकच्या कुरापती सुरुच आहेत.  या पार्श्वभूमीवर बाजवा यांनी  हे विधान केले आहे.

मंगळवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी बाजवा यांची या पदावर वर्णी लागली. पाकिस्तानी राजकारणात लष्कराला मोठे महत्त्व आहे. पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील निम्म्यापेक्षा अधिक वर्षांत सत्ता लष्कराच्या हाती राहिली आहे. त्यामुळे हे शक्तिशाली पद कोणाला मिळते याकडे सर्वाचे लक्ष होते. त्यात अन्य चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला सारून बाजवा यांची निवड झाली आहे. पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांना त्यांच्या लोकशाहीवादी, संयत आणि मध्यममार्गी भूमिकेसाठी ओळखले जाते. पाकव्याप्त काश्मीरविषयी त्यांचा गाढा अभ्यास आहे.