भारतीय जनता पक्षावर धर्म-ज्योतिष-संस्कृतच्या आडून देशात छुपा ‘अजेंडा’ राबवण्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसला माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीदेखील ज्योतिषशास्त्राचे समर्थन केल्याचा दाखला देऊन संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी गप्प केले. त्यासाठी नायडू यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २९ ऑगस्ट १९४४ साली इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्राचा हवाला दिला. मुंबईच्या तुरुंगातून लिहिलेल्या पत्रात नेहरूंनी इंदिरा गांधी यांना नवजात बालकाचे (राजीव गांधी) भविष्य पाहण्यासाठी चांगला ज्योतिषी शोधण्याचा सल्ला दिला होता.
नेहरू यांनी या पत्रात म्हटले होते की, ‘..योग्य व्यक्तीकडून नवजात बालकाचे भविष्य पाहून घे. जन्माची सौर वेळ नोंदवून घे. घडाळ्यापेक्षा सौर वेळ महत्त्वाची. त्यामुळे ती बिनचूक हवी.’ या पत्राचा हवाला देऊन नायडू यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांत हल्ला चढवला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेसकडे कोणताही मुद्दा शिल्लक नसल्याने विरोधक राज्यसभेत कामकाज बंद पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला. धर्मातरणाच्या मुद्दय़ावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी करीत विरोधकांनी सलग तिसऱ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज बंद पाडले. त्यासंबंधी नायडू म्हणाले की, सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांना चर्चा नकोय. कामकाज बंद करून देशात अराजकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे.
साध्वी निरंजन ज्योती, साक्षी महाराज, धर्मातरणावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या काँग्रेसने नाताळच्या दिवशी शाळा सुरू ठेवणार असल्याचे परिपत्रक केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने काढल्याचा आरोप केला. त्यावर स्पष्टीकरण देताना नायडू म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस २५ डिसेंबरला (नाताळ) असतो. त्यानिमित्ताने ‘गुड गव्हर्नन्स डे’ साजरा करण्यासंबंधी ते परिपत्रक आहे.
त्यात नाताळ साजरा करू नये असे कुठेही म्हटलेले नाही. ‘गुड गव्हर्नन्स डे’च्या निमित्ताने ऑनलाइन निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यामुळे नाताळची सुट्टी रद्द करण्याचा वाद काँग्रेसने उगाचच उकरून काढला. काँग्रेस सत्तेत असताना १९८७ साली काढलेल्या एका परिपत्रकाचा हवाला नायडू यांनी दिला. त्यात म्हटले आहे की – ‘(नवोद्य)  निवासी विद्यालय आहे. त्यात काही मुख्याध्यापक सणासुदीला सुट्टी घोषित करतात. ते नियमबाह्य़ आहे. प्रत्येक सण हा शाळेच्या आवारातच साजरा व्हायला हवा. त्या दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात येऊ नये.’ गांधी जयंतीला सुट्टी असूनही शाळेत स्पर्धा होतात. त्यामुळे गांधीजींचा अनादर होतो, असे मानणे चूक आहे.