मोबाईल संवादासोबतच स्वसंरक्षणाचे प्रमुख माध्यम व्हावे, या हेतूने केंद्र सरकारने हॅण्डसेटमध्ये पॅनिक बटण पुढील वर्षापासून बंधनकारक केले आहे. पॅनिक बटण असल्याशिवाय कोणताही हॅण्डसेट देशात विकता येणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. पॅनिक बटण दाबल्यानंतर संबंधित कॉल नजीकच्या सुरक्षा यंत्रणेशी किंवा पोलीस ठाण्याशी जोडला जाईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधेचा महिलांना विशेष उपयोग होणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सर्व आपत्कालीन सेवांसाठी ‘११२’ हा एकच क्रमांक उपयोगात आणण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर आता पॅनिक बटण सुविधेमुळे धोकादायक परिस्थितीत त्वरित संपर्क साधणे शक्य होणार आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, मानवी आयुष्य अधिक सुखकर बनण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे अधिक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे १ जानेवारी २०१७ पासून पॅनिक बटण असल्याशिवाय कोणताही मोबाईल हॅण्डसेट देशात विकता येणार नाही. त्याचबरोबर १ जानेवारी २०१८ पासून प्रत्येक मोबाईल हॅण्डसेटमध्ये अंतर्गत ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’ असेल, असेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या शासकीय आदेशात म्हटले आहे की, हॅण्डसेटमधील ५ किंवा ९ क्रमांक असलेले बटण दाबून धरल्यावर इमर्जन्सी कॉल संबंधित यंत्रणेपर्यंत जाईल आणि पीडित व्यक्तीला मदत मिळू शकेल.