तामिळनाडूतील आरके नगर विधानसभा मतदारसंघात १२ एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने अण्णा द्रमूकच्या दोन्ही गटांमध्ये पक्ष चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर निर्णय दिला आहे. शशिकला गटाला ‘टोपी’ (हॅट) तर पन्नीरसेल्वम गटाला ‘विजेचा खांब’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांच्या पक्षांना वेगवेगळ्या नावालाही मंजुरी दिली आहे. शशिकला यांच्या गटाला ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम अम्मा’ (एआयएडीएमके) हे नाव मिळाले आहे. तर पन्नीरसेल्वम गटाला ‘एआएडीएमके पुराट्ची थलैवी अम्मा’ नाव देण्यात आले आहे. दोन्ही गटांनी पक्षाच्या नावावर आणि निवडणूक चिन्हावर (दोन पान) दावा केला होता. बुधवारी निवडणूक आयोगाने दोन पान हे अण्णा द्रमुकचे निवडणूक चिन्ह जप्त करण्याचा निर्णय दिला होता.
शशिकला गटाने निवडणूक आयोगाला आपल्या पक्षासाठी एआयएडीएमके अम्मा नावाची मागणी केली होती. या गटाने निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्हासाठी ऑटो रिक्षा, बॅट आणि टोपी हे तीन पर्याय दिले होते. गुरूवारी आयोगाने शशिकला गटाला रिक्षा हे चिन्ह देण्याचा निर्णय दिला पण शशिकला गटाने टोपी चिन्हाची मागणी केली. त्यामुळे आयोगाने त्यांना टोपी या चिन्हाचे वाटप केले.
दरम्यान, चेन्नईतील आरके नगर मतदारसंघात १२ एप्रिल रोजी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. जयललिता यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त होती. शशिकला गटाकडून येथे टी.टी.व्ही. दिनाकरन हे उमेदवार आहेत. तर पन्नीरसेल्वम गटाकडून ई. मधुसूदनन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर पन्नीरसेल्वम गटाचे के.एम.पंडियाराजन यांनी फक्त मधुसूदनन हेच आरके नगरमधून अम्मांचे योग्य वारसदार असल्याचे म्हटले.