सरकारी रुग्णालयात दाखल असलेल्या अवघ्या चार दिवसांच्या अर्भकाचा मुंग्यांच्या चाव्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. पण डॉक्टरांनी हा आरोप फेटाळून लावताना अर्भकाच्या फुफ्फुसामध्ये जन्मतः दोष होता. त्याचबरोबर त्याचे वजनही कमी होते त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाकडून अर्भकाला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील विजयवाडा येथे ही घटना घडली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री कामिनेनी श्रीनिवास यांनी दिले आहेत.
गेल्या शुक्रवारी संबंधित अर्भक बेशुद्ध पडल्याचे दिसल्यावर त्याला रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यावेळेपासूनच अर्भकाकडून उपचारांना विशेष प्रतिसाद मिळत नव्हता. अर्भकाच्या अंगावर सलाईनची बाटली पडल्याचा आरोपही तिच्या पालकांनी केला आहे. अर्भकाचा ह्द्याचे ठोके आणि नाडी तपासण्यासाठी लावण्यात आलेल्या यंत्रामुळे त्याच्या अंगावर लाल रंगाचे काही डाग दिसत आहेत. पण त्याचा मुंग्या चावण्याशी काहीही संबंध नाही, असे रुग्णालयाने स्पष्ट केले. अर्भकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे जिल्हाधिकारी ए. बाबू यांनी सांगितले. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयाबाहेर काही पक्षांनी आंदोलनही केले.