बोको हराम या कट्टर इस्लामिक संघटनेच्या दहशतवाद्यांनी नायजेरियातील एका शाळेच्या वसतिगृहातून पळवलेल्या १०० मुलींबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. अपहरण केलेल्या काही मुलींनी उघडय़ा लॉरीतून उडय़ा टाकल्या आणि त्या जंगलात पसार झाल्या. मात्र किती मुलींचे अपहरण करण्यात आले आणि किती मुली जंगलात पसार झाल्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
जंगलात पसार झालेल्या विद्यार्थिनींचाही अजून पत्ता लागलेला नाही, असे या शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितले. या दहशतवादी संघटनेने अपहृत सर्व मुलींची सुटका केलेली आहे हा नायजेरियाच्या सैन्यदलाचा दावा या मुख्याध्यापकांनी फेटाळून लावला. ‘‘सर्व विद्यार्थिनींनी सुखरूप परतावे, अशीच प्रार्थना आम्ही करत आहोत. मात्र अद्याप एकही विद्यार्थिनी परत आलेली नाही’, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.