आपले पालक हयात असताना त्यांना २४ तास विजेच्या पुरवठय़ासारखी सुविधा उपलब्ध करून देऊ शकलो नाही, अशी खंत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी व्यक्त केली आहे.
तथापि, आपले बंधू एपीजे एम मराईकयार (९९) हे तामिळनाडूतील रामेश्वरम येथे वास्तव्याला असून त्यांना २४ तास विजेचा पुरवठा मिळत असल्याचा आपल्याला आनंद आहे, तंत्रज्ञानामुळेच ते शक्य झाले, असेही माजी राष्ट्रपतींनी म्हटले आहे. प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्तीचा वारसा आपल्याला पालकांकडून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
आपले वडील जैनुलाबुद्दीन हे १०३ वर्षे जगले आणि आपली आई अशिअम्मा ९९ वर्षे जगली. सध्या आपल्या बंधूंचे वय ९९ आहे. मात्र वीजकपात असली तरी आपल्या बंधूंना विजेचा पुरवठा केला जाईल अशी व्यवस्था आपण सौर ऊर्जा प्रणाली बसवून केली आहे, असेही एपीजे अब्दुल कलाम म्हणाले.
तथापि, त्या वेळी तंत्रज्ञान इतके प्रगत नसल्याने आपल्या आईवडिलांना ही सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकलो नाही, हीच आपली मोठी खंत आहे, असेही माजी राष्ट्रपती म्हणाले. शाळेतही विजेची सोय नव्हती सायंकाळी केवळ सात ते नऊ या कालावधीतच घरात मिणमिणता दिवा पेटविण्यात येत असे. तरीही अभ्यासात खंड पडू नये यासाठी आई आपल्याला केरोसीनचा छोटा दिवा देत होती, त्यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत अभ्यास करणे शक्य होत होते, असेही ते म्हणाले.
कलाम यांचे ‘रिइग्नायटेड : सायंटिफिक पाथ वेज टू ए ब्रायटर फ्यूचर’ हे पुस्तक उपलब्ध झाले असून त्यामध्ये त्यांनी सोसलेल्या यातना उद्धृत केल्या आहेत. कलाम यांचे निकटचे सहकारी श्रीजनपाल सिंह या पुस्तकाचे सहलेखक आहेत.