उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्य़ात चीनच्या लष्कराने केलेल्या घुसखोरीबाबत गुरुवारी लोकसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली. चीनच्या हेतूबद्दल सरकारला सावधानतेचा इशारा देतानाच विरोधकांनी, सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली.

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी या बाबतचा मुद्दा उपस्थित केला. पीपल्स लिबरेशन आर्मीने चामोली जिल्ह्य़ात भूभाग आणि हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. भारतीय हद्दीत २०० मीटपर्यंत आतमध्ये येऊन चीनच्या लष्कराने तळ ठोकला होता, असे शिंदे म्हणाले. ही अत्यंत महत्त्वाची घटना असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या बाबत कोणतेही स्पष्टीकरण देऊ नये ही आश्चर्याची बाब आहे, असे शिंदे म्हणाले. त्याला काँग्रेसच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय यांनी शिंदे यांना पाठिंबा देताना सांगितले की, चीनचे लढाऊ हेलिकॉप्टर बारहोती परिसरात घुसले आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारतीय महसूल अधिकाऱ्यांना माघारी फिरण्यास सांगितले.

उत्तराखंड आणि चीन यांच्यात जवळपास ३५० कि.मी. लांबीची सीमा असून अशा प्रकारच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलावी, अशी मागणी रॉय यांनी केली. सपाचे नेते मुलायमसिंह यांनी या बाबत सरकारला इशारा दिला आणि चीन हा धोकेबाज देश असल्याचे नमूद केले. चीन अधिक शक्तिशाली होतो तेव्हा तो समस्या निर्माण करतो, असेही ते म्हणाले. भारताला पाकिस्तानपासून जितका धोका नाही तितका तो चीनपासून आहे, असेही त्यांनी सांगितले. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार म्हणाले की, देशाची एकात्मता आणि ऐक्य आणि सीमेची सुरक्षा सरकारसाठी सर्वात महत्त्वाची आहे.