लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्यावर कागदफेक केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सहा खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्याच्या निषेधार्थ आज, मंगळवारी काँग्रेससह विरोधकांनी संसद भवन परिसरात आंदोलन केले. महाजन यांनी खासदारांच्या निलंबनाचे आदेश मागे घेऊन त्यांना सभागृहात बसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

कथित गोरक्षकांकडून हिंसाचार आणि जमावाकडून होत असलेल्या हत्यांच्या प्रकरणांवरून काल, सोमवारी लोकसभेत काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले होते. त्यांनी लोकसभा सभापती महाजन यांच्यावर कागदाचे तुकडे फेकले. यानंतर महाजन यांनी कारवाई करत काँग्रेसच्या सहा खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले. या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधक आज संसद भवन परिसरात एकत्र आले. त्यांनी कारवाईचा विरोध करत आंदोलन केले. महाजन यांनी निलंबनाचे दिलेले आदेश मागे घ्यावेत आणि खासदारांना सभागृहात बसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. लोकसभा सभापतींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दबावाखाली येऊ नये, असेही खरगे म्हणाले. दरम्यान या आंदोलनात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

दरम्यान, गोरक्षकांकडून होणारा हिंसाचार आणि जमावाकडून होणारी मनुष्यहत्या या प्रकरणांवरून काल लोकसभेत विरोधक आक्रमक झाले होते. त्याचवेळी काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा सभापती महाजन यांच्यावर कागदाचे तुकडे फेकले. महाजन यांनी कारवाई करत खासदार गौरव गोगाई, सुश्मिता देव, अधिरंजन चौधरी, रणजित रंजन, एम.के.राघवन, के. सुरेश यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले होते. या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.