जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या वादग्रस्त विधानांमुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. सईद यांच्या वादग्रस्त विधानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केंद्राची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी लोकसभेत सर्वच विरोधी पक्षांनी केली.
जम्मू-काश्मीरमध्ये शांततेत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकींचे श्रेय दहशतवादी, पाकिस्तान व फुटीरतावादाचे समर्थक असलेल्या हुर्रियतच्या नेत्यांना सईद यांनी दिले होते. एवढेच नव्हे तर सईद यांच्या पीडीपीच्या आठ आमदारांनी संसदेवरील हल्ला प्रकरणात फासावर लटकवण्यात आलेल्या अफजल गुरूचे शव त्याच्या कुटुंबीयांना देण्याची मागणी केली होती. विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाला बहुमत नसल्याने पीडीपीने भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली असली तरी; अगदी दुसऱ्याच दिवसापासून उभय पक्षांमध्ये संवेदनशील राष्ट्रीय मुद्दय़ांवरून मतभेद दिसून आले आहेत. मुख्यमंत्री सईद यांच्या निषेधाचा ठराव लोकसभेत संमत करण्याची मागणी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जदयू, राजद व समाजवादी पक्षाच्या खासदारांनी केली.    
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच विरोधकांनी सईद यांच्या विधानांवर पंतप्रधानांच्या निवेदनाची मागणी केली. सत्ताधाऱ्यांनी मागणी मान्य करण्यास नकार देताच काँगेस व तृणमूलच्या खासदारांनी एकच गलका केला. याच गोंधळात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, सईद यांच्या विधानाचे स्वागत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीत. त्यामुळे सईद यांच्या विधानांची दखल घेण्याची गरज नाही. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनीदेखील राजनाथ सिंह यांच्या मताशी सहमती व्यक्त केली. तृणमूलच्या सौगत रॉय यांनी हा मुद्दा अतिशय संवेदनशील असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, राजनाथ सिंह यांनी कालच या मुद्दय़ावर स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक शांततेत पार पडल्याचे श्रेय पाकिस्तान, हुर्रियतच्या नेत्यांना देण्याचा दावा सईद यांनी केला असला तरी सरकार त्यांच्याशी सहमत नाही. पण सईद यांनी आपले मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत मांडले होते, असा दावा पीडीपीचे नेते करीत आहेत. त्यामुळे याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. काँग्रेसच्या दीपेंदर हूडा यांनी मुख्यमंत्री सईद यांच्या निषेधाचा प्रस्ताव लोकसभेने मंजूर करावा, अशी मागणी केली. मात्र त्यास सत्ताधाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीशी युती करून सत्तेत आल्याने ‘ऐतिहासिक दिवस’ साजरा करणाऱ्या भाजपवर सईद यांच्या अराष्ट्रीय विधानांमुळे नामुष्की ओढवली आहे. सत्तास्थापनेचा आनंद साजरा करावा की सईद यांचा निषेध करावा, या संभ्रमात भाजप नेते आहेत.