पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सत्तारूढ ‘पीएमएल-एन’ पार्टीने बुधवारी संसदेत पूर्ण पाठिंबा जाहीर केला. शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधी नेते इम्रान खान व ताहीर-उल्-काद्री यांनी शरीफ यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी फेटाळून लावत या मंत्र्यांनी शरीफ यांच्या बाजूने आपला पाठिंबा व्यक्त केला.
इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्ष व काद्री यांच्या पाकिस्तान अवामी तेहरिक पक्षाने शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली, तरी संसदेतील सर्व राजकीय पक्ष त्याविरोधात असून त्यांनी शरीफ यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे, असे पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यां पक्षांनी केलेल्या मागण्यांना सरकारने पाठिंबा दिला आहे, परंतु शरीफ यांच्या राजीनाम्यासंबंधी केलेल्या सहाव्या मागणीसंदर्भात कसलीही तडजोड होणार नाही, असे स्पष्ट केले.