आयुर्वेदिक उत्पादनांवर १२ टक्के जीएसटी लावण्यात आल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले. योगी रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ उत्पादन कंपनीने याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा असे आवाहन आपण करणार असल्याचे ‘पतंजली’कडून सांगण्यात आले.

याविषयी पतंजलीचे प्रवक्ता एस. के. तिजारावाला म्हणाले की, सध्या आयुर्वेदिक उत्पादनांवर ५ टक्के कर लागतो. आयुर्वेदिक उत्पादने अत्यावश्यक असून त्यावरील कर वाढविल्यास चांगले आरोग्य ठेवणे कठीण होईल. त्यामुळे हा कर कमी करण्यात यावा या आशयाचे पत्रही संबंधित यंत्रणेला ‘पतंजली’ पाठविणार आहे.

‘पतंजली आपल्या ग्राहकांना आयुर्वेदिक टूथपेस्ट, साबण, शॅम्पू यांशिवाय अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देते. सर्वसामान्यांना किफायतशीर दरात आरोग्यपूर्ण उत्पादने मिळावीत यासाठी कंपनी कायम प्रयत्नशील असते. त्यामुळे १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यास या उत्पादनांच्या किंमतीवर त्याचा परिणाम होणार असून वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. मात्र या सर्व गोष्टीचा ग्राहकांना फटका बसू नये यासाठी ‘इनपुट क्रेडिट अॅडजस्टमेंट’चा विचार करु’ असेही तिजारावाला यांनी स्पष्ट केले.

सरकार एकीकडे वैद्यकीय उपचारांसाठी पारंपरिक भारतीय पर्यायी चिकित्सेला प्रोत्साहन देतानाच दुसरीकडे आयुर्वेदिक उत्पादनांवरील कर वाढवत असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. स्वदेशीचा केलेला प्रचार, कमी किंमती आणि मालाची प्रत यामुळे पतंजलीचे अर्थिक उत्पन्न मागील २ वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील आर्थिक वर्षात १०,५६१ कोटींचा महसूल प्राप्त करत ग्राहक उत्पादन कंपनी म्हणून ‘पतंजली’ हिंदुस्थान युनिलिव्हरनंतर दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये पतंजलीला मिळालेले यश पाहिल्यानंतर इतर ग्राहक उत्पादन कंपन्यांनीदेखील आपल्या उत्पादनांमध्ये आयुर्वेदिक उत्पादनांचा समावेश केला होता.