श्रीमंत भारतीयांच्या यादीत योग गुरु रामदेव बाबा यांचे सहकारी, ‘पतंजली’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण आणि डी-मार्टचे राधाकिशन दमनी यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी अव्वल स्थानी आहेत, अशी माहिती सहा वर्षांपासून श्रीमंतांची यादी प्रसिद्ध करणाऱ्या हुरन या संस्थेने दिली आहे.

रिटेल क्षेत्रातील दमनी यांनी उत्तुंग झेप घेत श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. त्यांच्या संपत्तीत ३२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बालकृष्ण गेल्या वर्षी २५ व्या स्थानी होते. मात्र यावेळी त्यांनी आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांच्या संपत्तीत १७३ टक्क्यांची वाढ होऊन ती ७० हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी पतंजलीचा कारभार १०, ५६१ कोटींपर्यंत पोहोचला होता. ही कंपनी अनेक बड्या परदेशी कंपन्यांना टक्कर देत आहे. मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत. जागतिक स्तरावर पहिल्यांदाच अव्वल १५ मध्ये त्यांनी स्थान पटकावले आहे. शेअर बाजारातील उसळीमुळे रिलायन्सचे शेअर्स वधारले. त्यामुळे अंबानी यांची संपत्ती ५८ टक्क्यांनी वाढली. ती आता २५७० अब्जांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे त्यांची ही संपत्ती येमेन या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीपेक्षा ५० टक्के अधिक आहे.